सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

इंडिया हाऊस

views

5:18
भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून मदत मिळत असे. अशी मदत करणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा होत. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या ह्दयात देशाच्या स्वातंत्र्याविषयी तळमळ होती. रँडच्या खुनात श्यामजी वर्मांचा हात असावा अशी सरकारला शंका आल्याने सरकारकडून त्यांना वारंवार त्रास होऊ लागला, तेव्हा ते इंग्लंडला निघून गेले. त्यांनी लंडन येथे इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय तरूणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. इंग्लंडमधील श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या क्रांतिकारी गोटातील मादाम कामा यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट सोसले. १९०७ मध्ये जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेस (International Socialist Conference) हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून सरदारसिंग राणा व मादाम कामा हे हजर राहिले. यात मादाम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला व त्यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रतिनिधींना आवाहन केले, की सर्व स्वातंत्र्यप्रिय राष्ट्रांनी हिंदी स्वातंत्र्य चळवळीना मदत करावी. इंडिया हाऊसशी संबंधित असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरूण. त्यांनी जुलै, १९०२ मध्ये कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.