गुणाकार भाग १

तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे

views

5:03
तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे : मुलांनो, आता आपण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे याचा अभ्यास करूया. त्यासाठी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण १ : भाताची लावणी करताना एका रांगेत २४४ रोपे, याप्रमाणे २८ रांगा लावून झाल्या. तर एकूण किती रोपे लावून झाली? उत्तर: मुलांनो, येथे तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणायचे आहे. म्हणून चौकटी पद्धतीने गुणाकार करताना आता आपल्याला दोन्ही संख्यांचा म्हणजेच गुण्य व गुणक संख्यांचा विस्तार करावा लागेल. म्हणून आपण त्यांचा विस्तार करून घेऊ. २४४ = २०० + ४० + ४ आणि २८ = २० + ८ असा या संख्यांचा विस्तार झाला. प्रथम आपण २०० ला २० ने गुणू. २०० आणि २० या पूर्ण शतक व पूर्ण दशक संख्या आहेत. म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या अंकांचा गुणाकार करून त्यानंतर जेवढी शून्ये असतील ती मोजून त्यापुढे लिहू. म्हणजेच २०० × २०= ४००० झाले. आता २० ने ४० ला गुणू. सुरुवातीला २ व ४ यांचा गुणाकार करू व त्यापुढे शून्ये लिहू. २ × ४ = ८ आणि त्यापुढे दोन शून्ये लिहिली असता ८०० झाले. आता २० व ४ यांचा गुणाकार करू. २० × ४ = ८० झाले. आता दुसऱ्या ओळीतील ८ ने २०० ला गुणू, २०० ×८ = १६००. हे ४००० च्या खालच्या चौकटीत लिहू. नंतर ४० ला ८ ने गुणू, ४० × ८ = ३२० झाले. ते ८०० च्या खालच्या चौकटीत लिहू. शेवटी ८ व ४ यांचा गुणाकार करू. तो ३२ आहे. आणि तो ८० च्या खालच्या चौकटीत लिहू. आता सर्व गुणाकार एका बाजूला उभ्या मांडणीत मांडून त्यांची बेरीज करू. पहा ४००० + १६०० + ८०० +३२० + ८० + ३२ = ६८३२ म्हणजेच एकूण ६८३२ रोपे लावून झाली.