संतांची कामगिरी Go Back संत ज्ञानेश्वर views 5:45 संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे इ.स १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ होते. तर लहान भावाचे नाव सोपानदेव असे होते. मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठी बसलेले छोटे गाव आहे. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, कारण त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला होता. त्यांचे लग्न झाले आहे, हे त्यांच्या गुरुंना समजताच त्यांनी त्यांना आपल्या घरी जाण्याची आज्ञा दिली. गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली. ही गोष्ट त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हती. कर्मठ लोक म्हणत की, एकदा संन्यास घेतल्यानंतर कोणतीही व्यक्ती परत संसार करू शकत नाही. आणि हे असे करणे धर्माच्या विरुद्ध आहे, असे त्यांना वाटत होते. त्याकाळी संन्याशाची मुले म्हणून त्या चौघांना खूप त्रास दिला जाई. या सर्व गोष्टींना कंटाळून प्रायश्चित्त म्हणून ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांनी वाळीत टाकले. वाळीत टाकणे म्हणजे त्यांच्याशी समाजातील कोणत्याही व्यक्तीने कसलाही संबंध ठेवायचा नाही. त्यांना मदत करायची नाही, त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचे नाही, त्यांना भिक्षा द्यायची नाही, अशा तऱ्हेने लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा म्हणजे एक अन्नाचा घासही दिला नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर लहान होते. त्यांच्या बालमनावर लोकांच्या बोलण्याचा परिणाम झाला ते खूप दु:खी झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दु:ख करत बसले. इतक्यात तिथे त्यांची बहीण मुक्ता आली. दारावर थाप मारून ती म्हणाली, ‘’ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दु:खी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील?” बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. त्यांनी झोपडीची ताटी उघडली. ताटी म्हणजे दरवाजा किंवा दार होय. ज्ञानेश्वर आपले दु:ख विसरून कामाला लागले. त्याकाळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्माच्या नावाखाली समाजातील गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा छळ होत होता. हे सर्व पाहून ज्ञानेश्वरांना वाईट वाटायचे तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. त्यांनी लोकांना सांगितले, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, उच्च- नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करू नका. समाजातील जे लोक दु:खी आहेत अशा लोकांना त्यांच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मदत करा. त्यांनी दिलेला उपदेश आजही सातशे वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माबद्दलचे ज्ञान संस्कृत भाषेतील ग्रंथांमध्ये दिले गेले होते. संस्कृत ही भाषा समाजातील काही ठरावीक लोकांनाच बोलता व लिहिता येत होती. त्यामुळे तेच लोक फक्त धर्माचा अभ्यास करत असत. सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषा समजत नसे. त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी होती. परंतु संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्य लोकांना मिळावे म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा सुमारे ९००० ओव्या असणारा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी मध्ये गीतेचा अर्थ मराठीत सांगितला आहे. याच ग्रंथाला ‘भावार्थदीपिका’ असेही म्हणतात. या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले करून दिले. त्यांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात म्हणजे अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी जिवंत समाधी घेतली. प्रस्तावना संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास