संतांची कामगिरी Go Back संत तुकाराम views 3:09 शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे इ.स १६ व्या शतकात संत तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांचे मोरे घराणे होते. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील सावकारीचा व्यवसाय करत. म्हणजे ज्यांना पैसे हवेत अशा लोकांना कर्ज देत व नंतर ते व्याजासकट वसूल करून घेत. तुकारामही पुढे हाच व्यवसाय करू लागले. परंतु पुढे एकदा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी आपल्या वाटणीची सर्व कर्जखते, म्हणजे कोणी किती कर्ज घेतले आहे याची नोंद असणारी कागदपत्रे इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना या कर्जातून मुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विट्ठलाचे भजन करत. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. आषाढ व कार्तिक महिन्यात ते पंढरीला विट्ठलाच्या दर्शनाला जात. त्याठिकाणी ते कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत व विठ्ठलनामात गुंग होऊन जात असत. तुकारामांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज सुद्धा जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा यांची शिकवण देत. ते आपल्या अभंगात म्हणतात, ‘’दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’’ म्हणजे तुम्ही दया, क्षमा, शांती ठेवली तर देव तुमच्यामध्ये वास करेल. तो अखंड तुमच्या सोबत राहील. ते समतेचा उपदेश देताना म्हणतात की ‘’जे रंजले गांजले! त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’’ म्हणजेच ते लोकांना सांगतात की तुमच्या अवती-भोवती जे लोक दु:खी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना पोटभर जेवण मिळत नाही, अशांना जो जवळ करतो, त्यांचे दु:ख घालविण्यासाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा साधू. देव त्याच्यातच आहे असे मानावे. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात चांगले विचार निर्माण केले. लोक संत तुकारामांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ग्यानबा-तुकाराम हा जयघोष एकू येतो. ज्ञानेश्वरांना ‘ग्यानबा’ असे म्हणतात. म्हणजे आज एवढ्या वर्षांनीही या दोन संतांचा जयजयकार होतो. तुकारामांनी लिहिलेली ‘तुकारामगाथा’ आजही घरोघरी वाचली जाते. त्याची आजही पारायणे होतात. प्रस्तावना संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास