संतांची कामगिरी Go Back संत एकनाथ views 2:14 संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांचा जन्म इ.स.१५३३ मध्ये पैठण येथे झाला. त्यांनी भक्ति मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च-नीच भेदभाव मानू नका, असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला. गोरगरीबांना, समाजातील जे मागासलेले लोक होते, जे सर्व सुखांपासून दूर होते, अशा लोकांना संत एकनाथांनी जवळ केले. इतकेच नाही तर, मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणिमात्रांवर दया करा असा लोकांनाही त्यांनी उपदेश केला. संत एकनाथ फक्त उपदेश करत नसत, तर जसे बोलत तसे ते स्वत: वागत. एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. उन रखरखत होते. गोदावरी नदी पत्रातील वाळू तापली होती. त्या तापलेल्या वाळ्वंटात एक छोटे पोरके मूल रडत बसले होते. हे मुल दलित कुळातील होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. जवळ कोणी दिसत नाही हे बघून नाथ त्या मुलाजवळ धावत गेले. त्या मुलाला उचलून कडेवर घेतले. आपल्या खांद्यावरील कापडाने त्याचे डोळे, तोंड पुसले व त्याच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून ते कापड त्याच्या डोक्यावर पांघरले. नंतर त्याच्या आई-वडिलांचा शोध करून त्यांनी त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वत:च्या वागण्यातून एकनाथांनी समानतेची व ममतेची, मायेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. तसेच संत एकनाथांनी लोकांना स्वधर्मरक्षणाच्या गोष्टींचाही उपदेश केला. प्रस्तावना संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास