संतांची कामगिरी

संत नामदेव

views

2:22
संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. असे म्हणतात की, नामदेव आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावायचे. त्यांचा जन्म शिंप्याच्या घरी झाला. त्यांचे वडील दामाशेटी हे शिंपी होते. त्यांचा जन्म इ.स १२७० मध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागरूकता निर्माण केली. ते भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले. वारकरी ज्या आचरण प्रणालीचे म्हणजे वागण्याच्या पद्धतीचे पालन करतात आणि ज्यामध्ये विठ्ठलभक्ती प्रमुख मानली जाते त्या धर्माला भागवत धर्म असे म्हणतात. असा भागवत धर्म लोकांना माहीत व्हावा व त्याप्रमाणे लोकांनी वागावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. आपल्या धर्माचे रक्षण करणे व भक्तीचा मार्ग अवलंबिणे यासाठी त्यांनी लोकांच्या मनात पक्का निर्धार निर्माण केला. संतनामदेवांनी आपली शिकवण व मानवधर्माचा संदेश भारतभर पोहचविण्यासाठी प्रवास केला. ते पंजाबात गेले. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते पहिले प्रचारक होते. त्यांनी हिंदी भाषेत सुमारे १२५ पदे लिहिली. त्यातील ६२ पदे शीख लोकांचा पवित्र ग्रंथ ‘गुरुग्रंथसाहिबा’ या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट केली आहेत. त्यांना पंजाबमधील लोक आपले मानत. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गात असत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरांतून मोठ्या भक्तीने गायले जातात. महाराष्ट्रात कठीण काळात त्यांनी एकात्मता जपण्याचे कार्य केले.