पृथ्वी आणि जीवसृष्टी

हिमस्वरूपातील पाणी

views

2:35
पृथ्वीवरील उपलब्ध असणारे पाणी हे द्रवरूप, स्थायुरूप आणि बाष्परूपात आढळते. स्थायुरुप म्हणजेच हिमस्वरूपातील पाणी होय. ते कसे तयार होते याची आपण माहिती घेऊ. ज्याप्रमाणे आपल्या फ्रीजमध्ये शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात बर्फ तयार होतो, त्याचप्रमाणे थंडप्रदेशातही तापमान कमी असल्याने तेथील ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होतात. हिमकण म्हणजे बर्फाचे बारीक बारीक कण. जसे आपल्याकडे पावसाचे पाणी पडते ना, तसेच या प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की, त्याचा आकार प्रचंड मोठा होतो. आपल्याकडे पावसाळ्यात जमिनीच्या उतारावरून पाणी जोरात वाहत जाते तसेच थंड प्रदेशात जमिनीच्या उतारावरून हे थर अतिशय मंदगतीने खाली सरकतात व त्यांची हिमनदी तयार होते. तसेच समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात. त्यांना हिमनग म्हणतात. हिमनगाचा १/८ भाग पाण्यावर तरंगतो. पण त्याचा उरलेला ७/८ भाग पाण्याच्या आत असतो. पूर्वीच्या काळी याची माहिती नसल्यामुळे अनेक जहाजांचे हिमनगाच्या पाण्यातील भागावर आपटून अपघात झाले आहेत.