पृथ्वी आणि जीवसृष्टी

पाऊस कसा पडतो ?

views

2:2
पाऊस पडण्यासाठी पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होणे आणि मग संघनन होऊन त्याचे पाणी होणे या दोन गोष्टी आवश्यक असतात. संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रुपांतर होणे. चला तर मग आपण जाणून घेऊ की, पाऊस कसा पडतो? सूर्य हा पृथ्वीवरील उष्णतेचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते. म्हणजेच त्याचे पाण्यात रूपांतर होते. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. असे अनेक सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात. त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. आणि असे जड पाण्याचे थेंब पावसाच्या रुपात जमिनीवर पडतात. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर काही पाणी जमिनीत जिरते. तर काही पाणी नद्यांना जाऊन मिळते. आणि आपण पाहिलेच आहे की, पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहोळ, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला जाऊन मिळते. तसेच सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते, हे पाणीही नद्यांना येऊन मिळते. याचाच अर्थ बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणीच पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. पाण्याच्या बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच ‘जलचक्र’ असे म्हणतात.