पृथ्वी आणि जीवसृष्टी

वातावरण

views

4:43
ज्याप्रमाणे पृथ्वीवर शिलावरण, जलावरण आहे, त्याचप्रमाणे वातावरण हा देखील पृथ्वीचाच एक भाग आहे. आपण सर्वजण श्वास घेतांना आपल्याला हवेतील ऑक्सिजनची गरज असते. आपण श्वास घेतो म्हणजे काय करतो, तर वातावरणातून हवेतील ऑक्सिजन शरीरात घेतो. आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवेचे आवरण आहे. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या या आवरणाला ‘वातावरण’ असे म्हणतात.पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो, तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. म्हणजेच कमी कमी होते. वातावरणाचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक असतात. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात असतात. हे तुम्ही शिकला आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे अनुक्रमे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानले जातात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी १३ किमी अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावलेले असते. अर्थातच यामुळे इतर वातावरणीय थरांपेक्षा या थरात हवेची घनता जास्त असल्याने तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होत असतात. उदाहरणार्थ हवा थंड झाली तर थंडी वाजते. आणि हवा गरम झाली की उकडायला लागते. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. हे बाष्प वर जाऊन ढग तयार होतात. त्यामुळे पाऊस पडतो. वातावरणात बदल झाल्यामुळे पाऊस पडणे, थंडी वाजणे, उन्हाळ्यात तापमान वाढणे असे अनेक महत्त्वाचे परिणाम सजीवांच्या जीवनात होत असतात.