पाहू तरी शरीराच्या आत

प्रस्तावना आंतरेंद्रिये,बाहयावयव,ज्ञानेंद्रिये,अवयव/इंद्रिय

views

3:04
आपल्याला हात, पाय, नाक, डोळे, कान असे अनेक प्रकारचे अवयव आहेत. त्यांच्या मदतीने आपण अनेक कामे करतो. तसेच आपल्या शरीराच्या आतील भागातही अनेक अवयव असतात. ते आपण पाहू शकत नाही. त्या अवयवांच्या मदतीने आपल्या शरीरातील अंतर्गत कार्य चालू असते. आज आपण या पाठात आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांची माहिती घेणार आहोत. आपण श्वास घेतल्यानंतर आपली छाती फुगते. असे का होत असेल? कारण आपण नाकावाटे घेतलेली हवा छातीच्या पोकळीत येते. त्यामुळे श्वास घेतल्यानंतर छाती फुगते. तुम्ही आजारी असताना डॉक्टर तुम्हांला तपासताना तुमच्या मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात. तुम्ही छातीवर हात ठेवता तेव्हा तुम्हांलाही नाडीचे ठोके जाणवतात. पण हे नाडीचे ठोके का पडत असतील? कारण शरीराच्या आत रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत असते. हदयाच्या आकुंचनामुळे ते रक्त पुढे पुढे जाते. हदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हदयाचा ठोका म्हणतात. हे ठोके व्यवस्थित पडतात की नाही हे आपल्याला नाडीच्या ठोक्यावरून समजते. म्हणून डॉक्टर मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात. आंतरेंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिय, म्हणजेच अवयव होत. ही इंद्रिये आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात, त्यांना बाह्यावयव असे म्हणतात. उदा. कान, नाक, हात, पाय, गळा, डोके इत्यादी. ही इंद्रिये आपल्याला डोळ्यांनी दिसतात. बाह्यावयवांना बाहयेंद्रिये असेही म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या पाच अवयवांना ज्ञानेंद्रिये असे म्हणतात. ज्या अवयवांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. त्यांना ‘ज्ञानेंद्रिये’ असे म्हणतात. “एखाद्या ठरावीक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय असे म्हणतात.