कुटुंबातील मूल्ये

सहिष्णू वृत्ती

views

5:09
कोणतीच व्यक्ती पूर्णपणे निर्दोष नसते. म्हणजेच अशी कोणतीही व्यक्ती नाही की जिच्यात दोष नाहीत. आपणां सर्वांमध्ये काही गुण-दोष असतात. पण हे दोष आपल्याला पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीने दूर करता येतात. आपले आणि इतर व्यक्तींचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबामध्ये तसेच नातेवाईकांमध्ये कधीकधी अनेक गोष्टींत मतभेद असतात. आपले मत वेगळे व इतरांचे मत वेगळे असू शकते. अशा वेळी माझेच म्हणणे खरे व इतरांचे खोटे आहे, असे न मानता दुसऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले पाहिजे. त्यांचे काय म्हणणे आहे हे समजून घेतले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना मनामध्ये निर्माण होते. तिची जोपासना करता येते. यातून एकमेकांच्या मतांचा आदर केला जातो. “आपल्यापेक्षा वेगळया मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय.” आपल्या भारत देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्म, पंथ, परंपरा आणि भिन्न रीतीरिवाज पाळणारे अनेक लोक राहातात. प्रत्येकाची संस्कृती, परंपरा व विचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. एक साधे उदाहरण घेऊ. तुमच्या वर्गातील काही मुले शाकाहारी असतील, तर काही मांसाहारी. आपल्या घरी जो आहार चालत आला असतो, तो आपण घेतो. शाकाहारी मुलांनी मांसाहारी जेवणाला नाक मुरुडू नये आणि मांसाहारी मंडळीनी शाकाहारी लोकांना पुचाट समजू नये. दोन्ही प्रकारचे आहार भिन्न असले तरी ते शरीराच्या गरजा पूर्ण करणारे असतात. हे समजून घ्यावे. अशा सहिष्णुतेमुळे विविधतेचे जतन होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. म्हणजेच समाजात शांतता, एकता राहाण्यासाठी सहिष्णुता खूप गरजेची आहे. सहिष्णुता आपल्याला आपल्याबरोबर इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते. सहानुभूतीने म्हणजे दुसऱ्याचे सुख - दु:ख समजून घेऊन ते सुख -दु:ख जणू काय आपलेच आहे, असे अनुभवणे म्हणजे सहानुभूती होय. एखाद्या व्यक्तीचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला आपल्याला सहिष्णुता लावते. आपल्या आसपासच्या परिसरातील अडचणी व समस्यांचे निराकरण करण्याचा म्हणजे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो.