सर्वांसाठी अन्न

सिंचनाच्या आधुनिक पद्धती

views

3:05
पिकांनाही योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध झाले तर भरघोस पीक मिळते. त्यासाठी काही ठिकाणी शेतात बांध घालून पाणी अडवून शेताला पाणी दिले जाते. पावसाच्या पाण्यासोबतच विहिरी, तलाव, धरण, नदी ह्यांचे पाणीही दिले जाते. पूर्वी पिकाला पाटाने पाणी दिले जात असे. पण त्यामध्ये बरेचसे पाणी वाया जायचे. म्हणजे ते जमिनीत मुरायचे, त्याची वाफ व्हायची. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की पाणी हे जीवन आहे, ते जपून वापरले पाहिजे. जेवढे पिकांना गरजेचं असते तेवढेच पाणी त्यांना दिले पाहिजे. म्हणूनच पाण्याची बचत करण्यासाठी सिंचनाच्या नवीन, आधुनिक पद्धतींचा वापर होऊ लागला. या पद्धती आहेत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. १) ठिबक सिंचन:- मुलांनो, ठिबक सिंचन समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करू. त्यासाठी चार कुंड्यांमध्ये माती भरून घ्या. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या झाडांच्या, फुलांच्या बिया टाकायच्या आहेत. एक मोठी बाटली पाण्याने भरून घ्या. त्याला एक नळी अशी लावा की सगळ्या कुंड्या एका क्रमाने येतील. ज्या ठिकाणी आपण बी पेरली आहे तिथे नळीला सुईच्या साहाय्याने छोटे छिद्र पाडून घ्या. त्यातून थेंबथेंब पाणी कुंडीत पडेल. हे झाले ठिबक सिंचन. ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. याचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला. २) तुषार सिंचन:- तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यांमधून पिकांवर पाणी फवारले जाते. तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. पाणी सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते. पावसासारखे पाणी पिकांवर पडते, त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात. यात पाण्याची २५ ते ३५% बचत होते. पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते. त्यामुळे पीक उत्पादनात १२ ते २०% वाढ होते.