सर्वांसाठी अन्न

खते

views

3:12
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात नवीन-नवीन पिके घेत असतो, वारंवार पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी-कमी होत जाते. म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते. यासाठी शेतकरी त्याच्या घराशेजारी मिळणारे शेण, पालापाचोळा ह्यांचा उपयोग खत तयार करण्यासाठी करतो. मातीमध्ये खत मिसळले की जमिनीची सुपीकता वाढते. हे नैसर्गिक खत असते. त्यात लेंडीखत, शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत इत्यादींचा समावेश असतो. परंतु आता रासायनिक खते वापरून जास्त पीक घेतले जाते. रासायनिक खते खनिज पदार्थांपासून तयार केलेली मानवनिर्मित खते असतात. या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात मिश्रण केले जाते. रासायनिक खताचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे, अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते. कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. पाण्याच्या अति वापरामुळे जमिनी क्षारपड होत आहेत. धरणक्षेत्रात, नदीकाठीच्या जमिनी ह्या क्षारपड झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाला आहे. त्यामुळे क्षार जमिनीतच साठू लागले आहेत. जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्याने व पिकांची फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होत गेल्या आहेत. अशावेळी मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे जमिनी क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे चांगले.