भूमी उपयोजन

नागरी भूमी उपयोजन

views

5:52
आता आपण भूमी उपयोजनाच्या प्रकारांपैकी दुसरा प्रकार पाहणार आहोत: तो आहे, नागरी भूमी उपयोजन. मानवाने अनेक क्षेत्रांत प्रगती केल्याने उद्योगधंदे, व्यवसाय यांच्यात वाढ झाली. त्यामुळे विसाव्या शतकात नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरी भागात शेती व शेतीपूरक व्यवसायखेरीज इतर व्यवसाय अधिक केले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येची वाढ होते. लोकसंख्येच्या मानाने नागरी भागात जमीन मर्यादित असते. त्यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येचे वितरण दाट असते, लोकवस्ती दाटीने वसलेली दिसून येते, नागरी वस्त्यांत भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते: १) व्यावसायिक क्षेत्र: शहरातील जमिनीचा काही भाग हा केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. उदा: दुकाने, बँका, कार्यालये यांच्यासाठी या जमिनीचा उपयोग केला जातो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यांतूनच निर्माण झाली. केंद्रीय व्यवहार विभाग हा नागरी भूमी उपयोजनचा एक विभाग असतो. मोठ्या शहरांतून व्यवसाय शहराच्या विशिष्ट भागात केंद्रित झालेला असतो. त्या भागास केंद्रीय व्यवहार विभाग असे म्हणतात. अशा भागात निवासी इमारती किंवा कारखान्यांच्या इमारती सहसा नसतात. तर बँका, ऑफिसे, दुकाने यांसाठीच्या इमारती अधिक असतात. २) निवासी क्षेत्र: निवासी क्षेत्रातील जमिनीचा वापर लोकांच्या राहाण्यासाठी केला जातो. घरे, इमारती, बंगले इ बाबींचा समावेश या क्षेत्रात होत असतो. या भागात लोकवस्ती जास्त असल्याने लोकसंख्येची घनता जास्त असते. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. ३) वाहतूक सुविधांचे क्षेत्र: मुलांनो, आपल्याला माहीत आहेच की कोणत्याही प्रदेशाचा विकास हा तेथील वाहतूक सुविधांवर अवलंबून असतो. शहरात अनेक प्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय असतात. या उदयोगधंद्यातून, कारखान्यांमधून तयार झालेला माल वाहून नेण्यासाठी व ग्रामीण भागातील कच्चा माल शहरात आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. तसेच माणसांसाठीही प्रवासी सेवा लागतात. अशी व्यवस्था करण्यासाठी वाहतुकीच्या विविध साधनांचा वापर शहरात केला जातो. उदा: सार्वजनिक बससेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. याशिवाय खासगी वाहनांची संख्याही जास्त असते. यांसाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था करणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. ४) सार्वजनिक सेवांचे क्षेत्र: लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती करतात. तर काही व्यवस्था घटकराज्य किंवा केंद्रशासन करते. त्या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येते. उदा: रुग्णालये, टपाल कार्यालये, पोलिस स्टेशन, पोलिस ग्राउंड, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींसाठी या क्षेत्राचा वापर केला जातो. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनेतील महत्त्वाचे क्षेत्र म्हणून मानले जाते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवासुविधांमुळे शमला जातो, किंवा तो कमी होतो. ५) मनोरंजनाची ठिकाणे: शहरी भागातील लोकांचा ताण कमी व्हावा म्हणून मनोरंजांची ठिकाणे खूप महत्त्वाची मानली जातात. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषत: राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह, सिनेमागृह इत्यादी साठी केला जातो.