सविनय कायदेभंग चळवळ

मिठाचा सत्याग्रह

views

4:01
महात्मा गांधीनी ब्रिटिश सरकाच्या विरोधात असहकार चळवळ उभी केली. त्याविषयी आपण मागच्या वेळी माहिती करून घेतली. त्यानंतर सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून त्यांनी दुसरे जनआंदोलन सुरू केले. सविनय कायदेभंग म्हणजे ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायी, अत्याचारी कायद्यांचा भंग करणे. म्हणजे ते कायदे न पाळणे किंवा कायदे मोडणे - म्हणजेच सविनय कायदेभंग होय. या चळवळीची संपूर्ण माहिती आपण या पाठात घेणार आहोत. याआधीच्या पाठात आपण लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आल्याचे तुम्ही वाचले आहे. हा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरु करण्यापूर्वी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. उदा: संपूर्ण दारूबंदी, शेतसारा माफी, लष्कर खर्चात ५०% कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता, इत्यादी मागण्या होत्या. तसेच त्यावेळी मिठावरील कर रद्द करावा आणि मीठ तयार करण्याची परवानगी फक्त सरकारलाच होती, ती रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी होती. परंतु ब्रिटिश सरकारने गांधीजींच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. तसेच समुद्राच्या मोफत मिळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या मिठावर सरकारने कर लादला होता. तो अन्यायी आहे असे महात्मा गांधींना वाटत असल्याने, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा मोठा व्यापक हेतू होता. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. १२ मार्च १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून गांधीजी आपल्या ७८ अनुयायांसह दांडीला जाण्यास निघाले. सुमारे ३८५ किमीच्या त्यांच्या मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली. सर्व हिंदुस्थानचे लक्ष त्यांच्या या पदयात्रेकडे होते. देशविदेशातील पत्रकार हा वेगळा व नवीन प्रयोग पाहण्यासाठी हजर होते. महात्मा गांधींनी जनतेला ब्रिटिश सरकारला न घाबरता कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी जनतेला 1)मिठाचा सत्याग्रह 2)सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार 3)परदेशी माल, दारू, अफू विकणाऱ्या दुकानांवर निदर्शने करणे. 4)परदेशी मालाची होळी करणे 5)करबंदी यांसारखे आदेश दिले होते. गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि सविनय कायदेभंग चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले. गांधीजींच्या या पदयात्रा मार्गातील हजारो लोक या यात्रेत आपणहून सामील झाले. ५ एप्रिल १९३० रोजी गांधीजी दांडी येथे पोहचले. या दिवशी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला.