पृथ्वीचे अंतरंग

भौगोलिक स्पष्टीकरण

views

5:31
पृथ्वी हा सौरमालेतील ग्रह आहे. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी अतिशय उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतः भोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस होत गेली. म्हणजेच आपण राहतो तो आहे पृथ्वीचा पृष्ठभाग. तर प्रथम पृथ्वीचा हा पृष्ठभाग थंड झाला. त्यांनतर हळूहळू पृथ्वीच्या अंतर्गत भागातील काही भाग थंड झाला. पृथ्वीची थंड होण्याची क्रिया पृष्ठभागापासून म्हणजे बाह्य भागापासून (भू - कवच) सुरू झाल्याने या भूकवचास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असल्याने भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती वाढत - वाढत जाते. तसेच पृथ्वी भूपृष्ठापासून विशिष्ट खोलीवर अंतरंगात अर्धद्रव स्वरूपात आहे पृथ्वीच्या पृष्ठांतून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग होय. अंतरंगाचे एकात एक असे तीन मुख्य थर आहेत. त्यांना भूपृष्ठापासून अनुक्रमे भूकवच, प्रावरण आणि गाभा असे म्हणतात. तर अशा या पृथ्वीच्या संपूर्ण अंतरंगाचा अभ्यास मानवाला करता आलेला नाही. कारण जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. त्यामुळे मानवाला पृथ्वीच्या अंतरंगाचे निरीक्षण करणे आजपर्यंत शक्य झालेले नाही. त्यामुळे जमिनीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणा-या भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतींनी अभ्यास करून काही अनुमाने म्हणजे निष्कर्ष काढले आहेत. त्यासाठी त्यांनी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी यांचा प्रामुख्याने अभ्यास केला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांत प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इ. घटक आढळले. हा तप्त लाव्हारस भूपृष्ठाच्या भेगांमधून वर आल्यानंतर भूपृष्ठावर पसरतो. हा तप्त लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांवरून अंतरंगाची रचना कशी असू शकते, हे समजून घेता आले.