ध्वनीचा अभ्यास

मानवी कर्ण

views

5:01
मानवी कर्ण म्हणजे मानवाचा कान. पंच इंद्रियांपैकी कान हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. कानाने आपण आवाज सर्व प्रकारचे ऐकतो. पण हा आवाज आपल्याला नेमका कसा ऐकू येतो? असा प्रश्न आपल्याला पडतो. तर ध्वनीतरंग कानावर पडल्याने कानामधील पडदा कंपित होतो. त्या कंपनाचे विद्युत लहरीत रुपांतर होते. त्या लहरी मज्जातंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतात. त्यामुळे आपल्याला ध्वनीचे ज्ञान होते. कर्ण हे आपले महत्त्वाचे इंद्रिय आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या कर्णाचे म्हणजेच कानाचे तीन भाग आहेत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण व आंतरकर्ण हे तीन भाग आहेत. त्यांची आता आपण माहिती घेऊ. बाह्यकर्ण: बाह्य म्हणजे बाहेरील भाग. आकृतीत दाखविल्याप्रमाणे बाह्यभाग ध्वनीतरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहचवतो. या बाह्यभागाची रचना झडपेसारखी असल्यामुळे कानावर पडणारे आवाज मध्यकर्णापर्यंत पोहचतात. मध्यकर्ण: मध्यकर्णाच्या पोकळीमध्ये पातळ असा पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन म्हणजेच दाब तिथे पोहोचतो, तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो. अशाप्रकारे ध्वनीतरंगामुळे पडद्याचे कंपन होते. आंतरकर्ण: आकृतीमधील हा भाग गोगलगाईच्या शंखाप्रमाणे दिसतो. ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो. आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार अशी पोकळी असते. तिला कर्णावर्त असे म्हणतात. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारून मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात, यानंतर मेंदूत त्या संकेताचे विश्लेषण केले जाते. कान हे ऐकण्याचे व शरीराचा तोल संभाळणारे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. पण कान स्वच्छ करण्यासाठी कानामध्ये काडी, टोकदार वस्तू घालू नये. तसेच इअरफोनच्या साहाय्याने मोठ्या आवाजात गाणी ऐकू नयेत. कारण त्यामुळे कानाला गंभीर प्रमाणात दुखापत होऊ शकते. कधी-कधी तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.