अवकाश निरीक्षण दुर्बिणी

अवकाशातील दुर्बिणी

views

03:23
अवकाशातील वेगवेगळ्या खगोलीय वस्तूंकडून येणारा दृश्य-प्रकाश व रेडिओ लहरी या पृथ्वीच्या वातावरणातून भूपृष्ठापर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे दृश्य-प्रकाश व रेडिओ दुर्बिणी ह्या भूपृष्ठावर उभारल्या जातात. मात्र या दुर्बिणीद्वारे चांगल्या प्रतीची निरीक्षणे करण्यात काही अडचणी येतात. त्यामुळे काही दुर्बिणी या अवकाशात सोडल्या जातात. अवकाशातून दृश्य प्रकाश हा वातावरणातून पृथ्वीवर पोहचतो. प्रवासादरम्यान या प्रकाशाचे वातावरणात शोषण होते. त्यामुळे आपल्यापर्यंत पोहचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. दुसरी अडचण म्हणजे वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ उडत असेल तर त्यातून येणारे दृश्य प्रकाशकिरण स्थिर राहत नाहीत. तर दिवसा सूर्यप्रकाश असल्यामुळे आकाशाचे निरीक्षण करता येत नाही. तसेच ढगाळ वातावरणात व शहरात असणारे विजेचे दिवे यांमुळेही आकाश निरीक्षणात अडथळे येतात. अशा प्रकारच्या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी ह्या पहाडांवर निर्जन जागी उभारल्या जातात. परंतु या सर्वच अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर अशी दृश्यप्रकाश दुर्बीण अवकाशात बसवणे सोयीस्कर ठरते. कारण अवकाशात या अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रकाशकिरणांच्या स्रोतांची मिळणारी प्रतिमा ही सुस्पष्ट व स्थिर असते. अशी कल्पना शास्त्रज्ञांनी सत्यात उतरवली आहे. 1990 मध्ये अमेरिकेच्या नासा (N.A.S.A) या संस्थेने हबल या दृश्यप्रकाश दुर्बिणीचे अवकाशामध्ये प्रक्षेपण केले. एडविन हबल या सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दुर्बिणीच्या प्राथमिक अंतर्गोल आरशाचा व्यास आहे: 2.4 मी किंवा 94 इंच. अवकाशातून आलेले प्रकाशकिरण हे या आरशाद्वारे परावर्तित होऊन त्याच्यासमोरील 33 सेमी किंवा 13 इंच व्यासाच्या बहिर्गोल आरशावर पडतात. त्या ठिकाणी त्यांचे परावर्तन होते आणि बाह्य वस्तूंची प्रतिमा तयार होते. हबल अंतरीक्ष दुर्बिणीची एकंदर लांबी 13.1 मी असून व्यास 4.3 मी आहे. ही अवाढव्य दुर्बीण प्रथमच स्पेस शटलचा उपयोग करून अवकाशात सोडण्यात आली. ही दुर्बीण भूपृष्ठापासून 569 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते आहे. अजूनही ही दुर्बीण कार्यक्षम असून या दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या निरीक्षणामुळे अनेक महत्त्वाचे शोध लागले आहेत.