दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर

views

3:42
दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर : मुलांनो, आता पर्यंत आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रुपांतर कसे करतात ते पाहिले. आता आपण याउलट, म्हणजेच दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णाकांत रूपांतर कसे करतात ते पाहूया. मुलांनो दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दिलेल्या दशांश अपूर्णांकातील दशांशचिन्हाचा विचार न करता मिळालेली संख्या व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशस्थानी लिहितात. छेद्स्थानी 1 हा अंक लिहून दिलेल्या संख्येतील दशांशचिन्हाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढी शून्ये 1च्या पुढे लिहितात. कसे ते आपण या उदाहरणांतून पाहूया. समजा, आपल्याला 26.4 या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रुपांतर करायचे आहे. यासाठी प्रथम आपण दिलेल्या नियमानुसार 26.4 या संख्येतील दशांश चिन्हाचा विचार न करता ती संख्या म्हणजेच 264 ही अंश स्थानी तशीच मांडली. आता छेद्स्थानी प्रथम 1 लिहिला. आणि 26.4 मध्ये दशांश चिन्हानंतर केवळ 4 हा एकच अंक आहे म्हणून या 1 नंतर एकच शून्य दिला. म्हणून त्याचे व्यवहारी अपूर्णांकात रुपांतर 264/10 असे झाले. आपण आणखी एक उदाहरण सोडवू. आपल्याला 0.04 या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रुपांतर करायचे आहे. यासाठी प्रथम आपण दिलेल्या नियमानुसार 0.04 या संख्येतील दशांश चिन्हाचा विचार न करता ती संख्या म्हणजेच 4 हे अंश स्थानी तसेच लिहिले. आता छेद्स्थानी प्रथम 1 लिहिला. आणि 0.04 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून या 1 नंतर दोन शून्य दिले. म्हणून त्याचे व्यवहारी अपूर्णांकात रुपांतर 4/100 असे झाले.