चौकोन

प्रस्तावना चौकोन

views

4:0
चौकोन : मुलांनो, मागील पाठात आपण त्रिकोणाविषयी माहिती घेतली. या पाठात आपण चौकोनाविषयी माहिती घेणार आहोत. मला सांगा चौकोन म्हटले की कोणकोणत्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात? वि: सर फळा, टीव्ही, भिंतीवरचे घड्याळ, खाऊचा डबा, लॅपटॉप, पुस्तक या सर्व वस्तू चौकोनी आकराच्या आहेत. शि: बरोबर आहे तुमचे. हा चौकोन दिसतो कसा हे तर आपल्याला माहीत आहे. पण तो तयार कसा होतो हे आपल्याला माहित नाही. म्हणून चला तर आपण चौकोन कसा तयार होतो ते पाहू. यासाठी एक कागद घ्या. या कागदावर चार बिंदू घ्या. पण हे चार बिंदू अशा पद्धतीने घ्या की, यातील कोणतेही तीन बिंदू हे नैकरेषीय असतील. नैकरेषीय बिंदू म्हणजे एका सरळ रेषेत नसलेले बिंदू”. या चार बिंदूंना अनुक्रमे बिंदू A, बिंदू B, बिंदू C, व बिंदू D अशी नावे द्या. आता कोणतेही दोन बिंदू जोडून एक रेषाखंड तयार करा. इथे आपण बिंदू A व बिंदू B एकमेकास जोडले. पहा रेषा AB तयार झाली आहे. मात्र बिंदू एकमेकांना जोडताना हे लक्षात ठेवा की कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असायला हवेत. पहा या आकृतीतील बिंदू C, आणि बिंदू D हे रेषा AB च्या एकाच बाजूस आहेत. आता हे चारही बिंदू एकमेकांना जोडा. पहा या मध्ये चार रेषाखंड एकमेकांस जोडून एक बंदिस्त आकृती तयार झाली आहे. या आकृतीलाच चौकोन असे म्हणतात. या आकृतीत आपला चौकोन ABCD तयार झाला आहे. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की, चार रेषाखंडांनी तयार झालेल्या बंदिस्त आकृतीस ‘चौकोन’ असे म्हणतात.