मुघलांशी संघर्ष

जयसिंगची स्वारी

views

4:10
जयसिंगची स्वारी :- शिवाजी राजांची वाढती ताकद पाहून दिल्ली दरबारात मोठी खळबळ माजली होती. विशेषतः आपला मामा शायिस्तेखान याला महाराजांनी अपमानित केले, मुघल फौजेचा पराभव केला, या गोष्टींचा औरंगजेबाला खूप राग आला होता. तसेच त्यात शिवाजीराजांनी सुरत शहर लुटल्याची बातमी त्याला कळाली. त्याच्या रागात आणखीनच भर पडली. त्याला वाटू लागले की शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी तशाच ताकदीचा, हुशार, अनुभवी व चतुर सरदार पाठवावा लागेल. म्हणून आपल्या दरबारातील ज्येष्ठ सरदार मिर्झाराजे जयसिंग याची औरंगजेबाने नेमणूक केली. जयसिंगाबरोबर दिलेरखान या पठाण सरदारालाही पाठविण्याचे औरंगजेबाने ठरविले. याशिवाय दाउदखान, कुतुबउद्दीन, सुजनसिंग, रामसिंग असे. अनेक लहानमोठे सरदार जयसिंग बरोबर आले. प्रचंड मोठे सैन्य, तोलामोलाचे सरदार, तोफखाना अशा तयारीनिशी जयसिंग 3 मार्च 1665 रोजी पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर जयसिंगाने आपल्या मोहिमेची पद्धतशीर आखणी केली. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रदेशाच्या भौगोलिक सीमा, डोंगरदऱ्या, किल्ले यांची त्याने बारकाईने माहिती जमा केली. त्यानंतर महाराजांचे शत्रू आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोव्याचे नि वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्दी यांनी महाराजांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये, तसेच महाराजांविरुद्ध आरमारी कारवाई किंवा मोहिमा काढाव्यात असे जयसिंगाने त्यांना सुचविले. शिवाजी राजांचे स्वराज्य आकाराने अतिशय लहान होते. जे किल्ले महाराजांकडे होते ते किल्ले जिंकून घेण्याचा बेत जयसिंगाने आखला. स्वराज्याच्या विविध भागांत मुघल सैनिकांच्या तुकडया पाठविल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील तुंग, तिकोना, लोटगड या किल्ल्यांच्या आसपासचा प्रदेश बेचिराख केला. तसेच राजधानी ‘राजगड’ या किल्ल्याच्या आसपासचा प्रदेशही जाळून-पोळून उध्वस्त केला. महाराजांनी सर्व दिशांनी आलेल्या मुघलांना लढा देण्याचा प्रयत्न केला.जयसिंगाचा लढा अशाप्रकारे चालू राहिल्यास आपले लहानशे स्वराज्य मुघल जिंकतील याची जाणीव महाराजांना झाली. त्यांनी नाईलाजाने शरणागती पत्करली. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. 13 जून 1665 रोजी शिवाजीराजे व जयसिंग यांच्यात तह झाला. हा तह “पुरंदरचा तह” म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या तहानुसार महाराजांनी, मुघलांना एकूण तेवीस किल्ले आणि त्यांच्या भोवतालचा वार्षिक चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. तसेच मुघलांना आदिलशाहाविरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले.