मुघलांशी संघर्ष

दक्षिणेची मोहीम

views

3:17
दक्षिणेची मोहीम :- महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यासाठी तब्बल 1 कोटी खर्च आला होता. महाराजांची इच्छा नसताना एवढा खर्च आला. तो त्यांना राजा म्हणून करावा लागला. स्वराज्याचा हा खर्च किंवा नुकसान भरून काढणे व स्वराज्य वाढविणे, या हेतूने राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजेच ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंडयाच्या कुतुबशहाची त्यांनी भेट घेतली. त्याच्याबरोबर महाराजांनी मैत्रीचा करार केला. आदिलशहाने महाराजांना अनुकूल असे सहकार्य केले नाही. तरीही महाराजांना त्याची काळजी नव्हती. कारण आदिलशाहीची मुघल आक्रमणानंतर झालेली अवस्था अत्यंत वाईट होती. त्यावरून महाराजांच्या लक्षात आले की आपली अंतिम लढाई ही मुघलांशी आहे. महाराजांनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर हे किल्ले आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला. परंतु, महाराजांच्या सैन्याने त्या ठिकाणच्या प्रदेशातील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. या जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली.या संपूर्ण मोहिमेतून महाराजांनी स्वराज्याच्या दुपटीहून जास्त प्रदेश मिळवला. साल्हेरपासून जिंजीपर्यंत एक सलग किल्ल्यांची साखळी निर्माण झाली. यामुळेच मुघल बादशाह औरंगजेबाला स्वराज्यात पूर्णपणे मुसंडी मारता आली नाही. राजाराम महाराजांना जेव्हा रायगड सोडावा लागला तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये वास्तव्य केले होते. त्यावेळी स्वराज्याचा कारभार जिंजीवरून चालविला जात होता. तेव्हा जिंजी स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आली होती. यातूनच महाराजांची दूरदृष्टी, शत्रूच्या ताकदीचा अचूक अंदाज ह्या गुणांचे दर्शन होते. म्हणूनच औरंगजेबाच्या राक्षसी आक्रमणातून स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडले. याचे श्रेय महाराजांच्या याच दक्षिणेच्या मोहिमेस जाते. शिवाजी महाराजांनी दक्षिणेवर विजय मिळविल्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजेच 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय पन्नास होते. त्यांच्या निधनाने कधीही भरून न काढता येणारे स्वराज्याचे नुकसान झाले. एका महान योद्धाचा, राजाचा शेवट झाला. महाराजांची समाधी रायगडावर आहे.