इतिहासाची साधने

लिखित साधने

views

05:49
लिखित साधने :- इतिहासाची दुसऱ्या प्रकारची साधने म्हणजेच लिखित साधनांविषयी माहिती घेणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्डस, आत्मचरित्रे, पुस्तके, पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे आणि चरित्रे या लिखित साधनांचा उपयोग होतो. या सर्व लिखित साधनांचा आधुनिक इतिहास लेखनांच्या साधनांत समावेश होतो. वृत्तपत्रे व नियतकालिके :- नियतकालिके म्हणजे एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणारे मुद्रित किंवा हस्तलिखित होय. उदा. दर वर्षाला प्रकाशित होणारे – वार्षिक, दर महिन्याला प्रकाशित होणारे – मासिक व रोज प्रकाशित होणारी वृत्तपत्रे. अशा नियतकालिकांतून आपल्याला त्या त्या काळातील घटनांविषयी माहिती मिळते. वृत्तपत्रांमधून एखादया घटनेचे सखोल विश्लेषण समजते. सविस्तर माहिती मिळते. समाजातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकांची मते समजतात. वृत्तपत्रांमध्ये अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. त्यांच्यातूनही खूप माहिती उपलब्ध होते. त्यातून आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधु, अमृतबझार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. ब्रिटिश राज्यकर्ते आपले शोषण कसे करत आहेत, त्यांच्या विरुद्ध आपण कसा लढा दिला पाहिजे, ब्रिटिशांची चुकीची धोरणे, त्या धोरणांचा भारतावर होणारा परिणाम यांची माहिती या वृत्तपत्रांतून दिली जात असे. ही वृत्तपत्रे त्या काळात केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. म्हणजे समाजातील लोकांना राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे, त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत करणे, यांसारखी कामे ही वृत्तपत्रे करीतच असत. पण आपल्या समाजातील घातक रूढी, परंपरा, विषमता याविषयीही ती लोकांना जाणीव करून देत असत.