युरोप आणि भारत

प्रस्तावना

views

03:55
प्रस्तावना : आपल्याला माहीत आहेच की भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. इंग्रज म्हणजेच ब्रिटिश हे इंग्लंड देशातून आले होते. इंग्लंड हा देश युरोप खंडात येतो. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. म्हणजे युरोप खंडात एखादी घटना घडली की त्याचे परिणाम भारतावर झालेले दिसून येत होते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. प्रबोधनयुग भाग १ :- युरोपच्या इतिहासात मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक. हे प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधनयुग असे म्हणतात. प्रबोधन म्हणजे काय? ते समजून घेऊ. प्रबोधन म्हणजे जनजागृती. वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या कल्पना बाजूला सारून काही विचारवंतांनी जीवनाविषयी नव्याने विचार करायला सुरुवात केली. त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. आणि मग अंधश्रद्धा, जुन्या समजुती मागे पडल्या. एका नव्या युगाची सुरुवात झाली. त्याला प्रबोधनयुग म्हणतात. प्रबोधन म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती होय. प्रबोधनयुगात सर्वच क्षेत्रात जुने विचार, तत्त्वज्ञान मागे पडले. व त्या जागी नवे विचार, नवे तत्वज्ञान उदयास आले. प्रबोधनयुगात युरोपातील कला म्हणजे शिल्पकला, चित्रकला, स्थापत्य म्हणजे वास्तू बांधकामात बदल झाले. लोकांनी जुने विचार, परंपरा सोडून नवीन गोष्टी अंगिकारल्या, स्वीकारल्या. यातूनच मानवाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवता वादाला चालना मिळाली. याकाळात माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. पूर्वी धर्म केंद्रस्थानी होता. धर्म सांगेल तसे केले जात होते. परंतु प्रबोधन काळात मानवाचे सुख व मानवाला महत्त्व दिले गेले.