युरोप आणि भारत

युरोपातील वैचारिक क्रांती

views

02:11
युरोपातील वैचारिक क्रांती: प्रबोधनकाळात युरोपात अनेक क्षेत्रांत बदल झाले. या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमधील लोकांच्या विचारात प्रचंड प्रमाणात बदल होऊन युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. नवीन साहित्य, नवे ज्ञान, नवीन विचार यामुळे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून, म्हणजे हे असे का घडते? अशा दृष्टीने पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना 'वैचारिक क्रांती' असे म्हणतात. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला गती मिळाली. राजकीय क्षेत्रातील क्रांती: मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या घटनेस ‘क्रांती’ असे म्हणतात. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक बदल घडून आले. १८ व्या शतकात तसेच १९ व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड 'क्रांतियुग' म्हणून ओळखला जातो. उदा. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती या बदल घडविणाऱ्या घटना होत्या. तसेच या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला, कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इ.स १६८९ च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. अशा बऱ्याच घटना या काळात घडल्या.