१८५७ चा स्वातंत्र्यलढा

स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम भाग २

views

3:15
स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम भाग २ :-भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली;- १८५७ चा उठाव प्रथम हिंदी लष्करातच झाला. त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची परत रचना करण्याचे काम तातडीने हाती घेतले. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढविण्यात आले. हिंदुस्थानातील सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रज फौजेच्या हाती ठेवण्यात आली. शस्त्रागार व तोफखाना इंग्रजी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. १८५७ पूर्वी लष्करी तुकड्यात सर्व जातीचे सैनिक असत. आता लष्करी तुकड्यांची उभारणी जातवार करण्यात आली. उदा. पंजाबी, शीख, गुरखा, रजपूत, मराठा यांच्या जातीनुसार लष्करी तुकडया उभारल्या गेल्या. अशी लष्कराची जातवार व्यवस्था केल्यामुळे भारतीयांमध्ये एकात्मतेची भावना तयार होणार नाही, असा इंग्रजांचा हेतू होता. जनतेपासून लष्कर दूर ठेवण्यासाठी इंग्रज प्रयत्न करू लागले. हिंदी सैनिकांच्या हाती वर्तमानपत्रही न पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी काय चालले आहे हे समजत नव्हते. लष्करातील वरच्या अधिकाऱ्यांच्या सर्व जागा इंग्रजांकरिता राखून ठेवण्यात आल्या. परत भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. आणि जर उठाव झालाच तर तो सहजासहजी चिरडून टाकण्याइतकी तयारी इंग्रजांनी हिंदी लष्कराची पुर्नरचना करून केली.धोरणात्मक बदल :-१८५७ चा उठाव हा भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळेच झाला होता. म्हणून इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे धोरण स्वीकारले.ऐक्य पुन्हा होऊ नये म्हणून इंग्रजांनी मोठे प्रयत्न केले. ‘फोडा आणि राज्य करा’ हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले.