आर्द्रता व ढग

ढग

views

3:46
ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहीत अवस्थेत असतात. म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात. सूक्ष्मकण अतिशय लहान असतो. त्याच्याभोवती झालेल्या सांद्रीभवनाने ढगातील जलकण तयार होतो. पावसाच्या एका थेंबाचा व्यास जास्तीत जास्त 5 मिमी असतो. आकृतीत हा थेंब मोठा करून दाखविला आहे. आणि त्यामुळे पावसाच्या एका थेंबाच्या तुलनेत सूक्ष्म कण व सांद्रीभवनाने तयार झालेले ढगातील जलकण किती लहान असतात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. जमीन तापल्यामुळे जमिनीलगतची हवा तापते, तापलेली हवा प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता कमी होते. अशी गरम व हलकी झालेली हवा उंचावर जाऊ लागते. हवा जसजशी उंचावर जाऊ लागते तसतसे हवेचे तापमान कमी होऊ लागते. हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. त्यामुळे हवेची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणांत व हिमकणांत रुपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी ठरते. हवेत बाष्पाचे प्रमाण किती आहे, त्यावरून हवेची सांद्रीभवन पातळी ठरते. तसेच दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरत असते. सांद्रीभवनाच्या प्रक्रियेमुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगतात. हे जलकण व हिमकण हवेतील धुलीकणांत एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार वरती जाणाऱ्या प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात.