आर्द्रता व ढग Go Back क्युम्युलोनिम्बस ढग views 3:51 क्युम्युलोनिम्बस ढग या प्रकारचे ढग निर्माण झाले की वादळ होणार असते. वादळाची सूचना या ढगातून समजते. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून एखाद्या पर्वताच्या आकाराचे असतात. या ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगांत गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. या ढगांमुळे वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते. परंतु, हा पाऊस फार काळ टिकत नाही. वळवाच्या पावसासारखा हा पाऊस थोड्याच काळासाठी असतो. आकाशात असणाऱ्या या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिम्बस या ढगांतून वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन (+) व खालच्या बाजूला ऋण (-) प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारांतील या फरकांमुळे विद्युत प्रभार निर्मितीस अनुकूलता तयार होते व विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो. आकाश एका क्षणात उजळून निघते. वीज जमिनीवर कोसळताना किंवा आकाशात चमकताना विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे विजेचा मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वरखाली फिरतात. प्रत्येक वेळी ते आपल्यात आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंबांचे आकारमान व वजन वाढून थेंब मोठे होऊन, इतके जड होतात, की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरुपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते. त्यामुळे हे थेंब गोठतात व गारांच्या स्वरुपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असे म्हणतो. प्रस्तावना, भौगोलिक स्पष्टीकरण, बाष्प बाष्पीभवन वातावरणातील आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता करून पहा ढग ढगांचे प्रकार क्युम्युलोनिम्बस ढग