पेशी रचना व सूक्ष्मजीव

पेशींचे मोजमाप व निरीक्षण

views

3:42
पेशींचे मोजमाप कसे केले जाते त्या विषयी आपण जाणून घेऊया. १६७३ मध्ये ॲन्टोन ल्युवेन्हॅाक यांनी विविध प्रकारची भिंगे एकत्र केली आणि त्या भिंगांपासून सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केले. या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे निरीक्षण सर्वप्रथम ॲन्टोन ल्युवेन्हॅाक यांनी केले. पेशी खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांनी त्या दिसत नाहीत. जर पेशी पाहायच्या असतील तर त्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपल्याला दिसतात. पेशी इतक्या लहान असतात की त्यांचे मोजमाप करण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करावा लागतो. 1सेंटीमीटर=10मिली मीटर, 1 मिलीमीटर =1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर = 1000 नॅनोमीटर. पेशींच्या निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. त्यातील भिगांमुळे काचपट्टीवर ठेवलेली वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते. आपण सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने कांद्याच्या पेशी कश्या दिसतात ह्याचा एक प्रयोग करून पाहूया. प्रथम एक कांदा घेऊन त्या कांद्याची एक फोड करून घ्या. त्या फोडीच्या खोलगट भागातील एक पातळ पापुद्रा काढून घ्या. आता हा कांद्याचा पातळ पापुद्रा घडी न पडू देता सूक्ष्मदर्शिकेच्या काच पट्टीवर ठेवा आणि त्यावर एक पाण्याचा थेंब टाका. तसेच आयोडिनच्या / इओसिनच्या विरल द्रावणाचा एक थेंब त्यावर टाका. आता ह्या पापुद्र्यावर आच्छादन म्हणून काच ठेवा. आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या भिंगाखाली त्याचे निरीक्षण करा. पाहा या सूक्ष्मदर्शिकेच्या भिंगातून कांद्यांच्या पापुद्र्यांकडे पाहिले तर आपल्याला कप्प्यांसारखी रचना दिसते. ती रचना म्हणजे पेशी होय. तुम्ही अशाचप्रकारे सूक्ष्मदर्शिकेखाली वनस्पतींच्या विविध भागांचे म्हणजे पान, खोडाची साल, मूलाग्रे यांचे निरीक्षण करा.