संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

अन्नपदार्थांमार्फत रोगप्रसार

views

4:44
मुलांनो, हे चित्र पहा आणि त्याचे नीट निरीक्षण करून मला सांगा या चित्रात तुम्हांला काय दिसते आहे? अगदी बरोबर. अशा पंगती सण समारंभावेळी बसतात. एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. गॅस्ट्रो झालेली व्यक्ती जुलाब व उलट्यांनी हैराण होते. हे कशामुळे होते? तर अन्नपदार्थांतून रोगाचे जंतू लोकांच्या शरीरात गेल्याने होते. यालाच अन्नातून विषबाधा होणे असे म्हणतात. म्हणजेच अन्नामार्फत शरीराला घातक पदार्थांचा शरीरात प्रवेश झाल्याने असे रोग होतात. आपल्या आसपासच्या परिसरात माश्या असतात. या माश्या घाणीवर बसतात. रोगी माणसाच्या विष्ठेवर माश्या बसल्या की त्या माश्यांच्या पायांना विष्ठेतील रोगजंतू चिकटतात. याच माश्या उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर बसतात. आणि त्यांच्या पायांना, शरीराला लागलेले रोगजंतू त्या अन्नपदार्थांमध्ये जातात. असे अन्नपदार्थ खाल्ले, की खाणाऱ्याच्या शरीरात ते रोगजंतू शिरतात आणि त्या व्यक्तीस त्या रोगाची लागण होते. म्हणूनच अन्न नेहमी झाकून ठेवणे महत्त्वाचे असते. तसेच मुलांनो आपणही उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याचे नेहमी टाळले पाहिजे. अशा पदार्थांवर धूळ, रोगजंतू असतात. म्हणून असे पदार्थ खाणे नेहमी टाळले पाहिजे. मग मुलांनो सांगा पाहू: आपण आपल्या घरातही अन्न बनवितो. आपल्या घरातही विविध प्रकारचे अन्नपदार्थ असतात. या अन्न पदार्थांवर धूळ, माश्या बसू नयेत म्हणून तुम्ही काय कराल? . अन्नपदार्थ झाकून ठेवल्यामुळे त्यावर माश्या बसू शकत नाही. त्यामुळे रोगजंतू अन्नात शिरण्याचा धोका टळतो आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोगप्रसाराला आळा घालता येतो. म्हणून अन्न नेहमी झाकून ठेवावे.