स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

क्रिप्स योजना

views

3:57
१९३९ साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील घडामोडींमुळे भारतात क्रिप्स योजना देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता. म्हणजेच जपान विरुद्ध इंग्लंड अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या समुद्रातील ठिकाणावर हल्ला करून युद्धात प्रवेश केला. जपानने जोरदार कामगिरी करीत इंडोचायना, इंडोनेशिया, मलाया इ. प्रदेश एकामागून एक जिंकून घेतले. एवढेच नव्हे तर ब्रिटीशांच्या ताब्यात असणाऱ्या ब्रह्मदेशावर हल्ला करून ८ मार्च १९४२ रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून जपानने ताब्यात घेतली. अशा प्रकारे ब्रह्मदेश शत्रूच्या हाती जाऊन शत्रू हिंदुस्थानच्या दरवाजावर आल्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल हे चांगलेच हादरले. जपानने हिंदुस्थानवर हल्ला केला, तर हिंदुस्थानचे संरक्षण आपण यशस्वीपणे करू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. हिंदी लोकांच्या सहानुभूती शिवाय हिंदुस्थानी साम्राज्याचे आपणास संरक्षण करता येणार नाही, याची खात्री होऊन रंगून जपानने ताब्यात घेतल्यानंतरच्या अवघ्या तीन दिवसांनी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स या ब्रिटिश पार्लमेंटमधील नेत्यास हिंदुस्थानात राजकीय शिष्टाई करण्यास पाठविण्याची घोषणा केली. क्रिप्स यांनी मार्च १९४२ मध्ये भारताविषयीची एक योजना भारतीयांपुढे मांडली.