स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

भारतीय नौदल व विमान दलातील उठाव

views

3:42
दुसऱ्या महायुद्धाची रणधुमाळी चालू असताना १९४२ साली अतिपूर्वेकडे रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथील ‘तलवार’ या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. ‘तलवार’ ही नौदलातील प्रसिद्ध लढाऊ नौका होती. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी नौदल सैनिकांनी संप पुकारला. त्यांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकावला. तसेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. नौदलात असा प्रकार कधीच घडला नव्हता. त्यामुळे गोरे अधिकारी चक्रावून गेले. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला उठावक-यांनी गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कापड गिरण्या, कारखाने व रेल्वे वर्कशॉपमधील शेकडो कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अतिशय यशस्वी झालेला असा हा उठाव होता. अशा प्रकारचा उठाव चालूच राहिला तर त्यातून भीषण रक्तपात घडून आला असता. राष्ट्रीयसभेच्या एकूण राजकीय ध्येयधोरणात न बसणारी ही घटना होती. कोणीतरी मदत करून नौदल सैनिकांचा हा उद्रेक शमवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. राष्ट्रीयसभेचे नेते सरदार वल्लभभाई पटेल या वेळी मुंबईत धावून आले आणि त्यांनी नौदल सैनिक व सरकार यांच्यात वाटाघाटी घडवून आणून “कोणाही नौदल सैनिकास शिक्षा होणार नाही व बंड करून उठल्याबद्दल कोणताही सूड उगवला जाणार नाही.” असे सरकारकडून मान्य करून घेतले. अशा प्रकारे नौदलातील हा अभूतपूर्व उठाव शांत झाला. विशेष म्हणजे मुंबईतील नौसेनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कलकत्ता, कराची, अंबाला, मेरठ, मद्रास इ. ठिकाणच्या हवाई दलातील अधिका-यांनीही संप पुकारला. हा उठाव म्हणजे फार दिवस जरी टिकला नाही, तरी त्याचा राज्यकर्त्यांच्या नीतिधैर्यावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला. तसेच हा उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निदर्शक होते.