समतेचा लढा

प्रस्तावना

views

6:37
आतापर्यंत भारतातील क्रांतिकारकांनी, नेत्यांनी, सामन्य जनतेने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कशाप्रकारे लढे दिले याची माहिती आपण घेतली. भारतीयांनी राजकीय स्वतंत्र्यासाठी दिलेला लढा आधुनिक भारताच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण होता. हा लढा फक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा नव्हता. तर तो मानवजातीच्या संपूर्ण मुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या राजकीय लढ्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या अनेक गोष्टींनाही विरोध होऊ लागला. मानवाच्या विकासासाठी जसे राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, तसेच समताही खूप महत्त्वाची आहे, हे तत्त्व लोकांना पटू लागले. आपल्याला माहीत आहेच की स्वातंत्र्यपूर्व भारताची समाजव्यवस्था ही जातिव्यवस्थेवर अवलंबून होती. तसेच स्त्रियांना हीनतेची वागणूक दिली जात असे. शेतकरी, कामगार यांचे सर्व प्रकारचे शोषण समाजातील उच्च वर्गाकडून केले जात असे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान ठेवल्याशिवाय आजच्या आधुनिक भारताची जडणघडण कशी झाली हे समजू शकणार नाही. म्हणून मुलांनो आज आपण या पाठात अशा काही चळवळींचा अभ्यास करणार आहोत.