समतेचा लढा

कामगार संघटन

views

4:10
आपल्याला माहीत आहे की भारतात खऱ्या अर्थाने उद्योगांची सुरुवात १८५३ मध्ये मुंबईतील कापड गिरणीने झाली. त्यानंतर रिश्रा येथे तागाची गिरणी १८५५ मध्ये सुरु झाली. १९०७ साली जमशेदपूरचा पोलाद कारखाना सुरु झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात भारतात नव्हता. तरीही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी या काळात अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. शशिपद बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांच्या स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढे महत्त्वाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. कामगार चळवळीचे अग्रदूत नारायण लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये ठाणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कान्हेसर हे होते. त्यांनी कामगारांच्या हितासाठी १८९० मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली गिरणी कामगार संघटना स्थापना केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. २३ सप्टेंबर १८८४ रोजी कामगारांची पहिली सभा लोखंडे यांनी मुंबईतील परळ येथे घेतली. त्यांनी ‘दीनबंधू’ वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न, दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला. २४ एप्रिल १८९० रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर कामगारांची मोठी सभा झाली. नारायण लोखंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. प्लेगच्या आजाराने १८९७ मध्ये श्री. नारायण लोखंडे यांचे निधन झाले.