प्रकाशाचे परिणाम

सूर्यग्रहण

views

2:30
सूर्य हा आकाराने प्रचंड मोठा विस्तारीत प्रकाशस्त्रोत आहे. जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो तेव्हा चंद्रामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या सावलीच्या भागातून सूर्यबिंब दिसत नाही. किंवा कमी प्रमाणात दिसते. यालाच ‘सूर्यग्रहण’ असे म्हणतात. जेव्हा सूर्यबिंब चंद्राने पूर्ण झाकले जाते तेव्हा या ग्रहणास ‘खग्रास सूर्यग्रहण’ असे म्हणतात. परंतु ज्यावेळेस सूर्यबिंब चंद्राने पूर्णपणे झाकलेले नसते तेव्हा त्या ग्रहणास ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ असे म्हणतात. तसेच चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेव्हा चंद्राने सूर्यबिंबाचा परीघ वगळता सर्व भाग झाकलेला असे दिसते. सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो. त्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. सूर्याकडून निघणारी हानीकारक अतिनील किरणे सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर पोहचत असतात. त्यामुळे आपल्या डोळ्याला इजा पोहोचण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ग्रहण पाहतेवेळेस काळ्या चष्म्याचा वापर करावा. सूर्यग्रहण फक्त आमावस्येच्या दिवशीच होत असते. परंतु सर्वच आमावस्येला सूर्यग्रहणे होत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. आपण सूर्यग्रहणाविषयी माहिती अभ्यासली आहे. आता आपण चंद्रग्रहणाविषयी माहिती अभ्यासुया.