शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर

views

4:47
संत ज्ञानेश्वर :- संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म पैठणजवळील ‘आपेगाव’ येथे झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे होती. ज्ञानेश्वरांनी संस्कृतभाषेतील ‘भगवदगीता’ सामान्य लोकांना समजण्यासाठी ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने मराठीत आणली. यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाच्या अवस्थेचे नाट्यमय वर्णन केले आहे. या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी ‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना केली. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. त्यांनी सर्व लोकांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पण अशा परीस्थितीतही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही, की कोणाविषयी मनामध्ये वाईट विचारही आणला नाही. पुढे ते पैठणला गेले आणि तेथे त्यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वर म्हणतात, पृथ्वीवरील सर्व मानव जातीचा उद्धार होऊ दे. जो जे मागेल ते त्याला मिळू दे. संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणत. त्यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ‘आळंदी’ येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि बहिण मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत.