भारत १९६० नंतरच्या घडामोडी

प्रस्तावना

views

3:29
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० ला आपण संविधानाचा म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून आपण २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. १९५० मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सार्वभौम म्हणजे ज्या राष्ट्रावर किंवा देशावर इतर कोणत्याही देशाचे वा राष्ट्राचे वर्चस्व नाही व जे स्वतंत्र आहे असे राष्ट्र. लोकशाही म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार लोकांकडून, लोकांसाठी व लोकांमार्फत केला जातो असे राष्ट्र होय. म्हणजेच भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सभोवताली बघितले तर तुम्हाला जाणवेल की, आपला समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजेच त्यात अनेक जाती, धर्म, भाषा, वंश, आहार, वेशभूषा असणारे लोक एकत्र राहत आहेत. आपला देश हा विविधता असणारा देश आहे. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची बाब होती. हे जरी खरे असले तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. उदा. आर्थिक, राजकीय, सामाजिक व विस्थापितांचे प्रश्न, सर्व क्षेत्रात विकास कसा करावयाचा यांसारखे अनेक प्रश्न भारतापुढे होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात धार्मिक दंगली, हिंसाचार, निर्वासितांचे प्रश्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते. भारताच्या फाळणीतून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झाले होते. त्या देशातून येणाऱ्या असंख्य विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे यांसारखे अनेक प्रश्न स्वतंत्र भारतापुढे होते.