वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

कौशल्ये आणि कार्यक्षमता

views

4:07
तुमच्या घरी किंवा शेजारी लहान बाळ असेल तर तुम्ही त्याचे बारकाईने निरीक्षण करा. बाळ अगदी लहान असते तेव्हा म्हणजेच तीन चार महिन्यापर्यंत ते स्वत:ची कुठलीच कामे स्वत: करू शकत नाही. त्याला भूक लागली किंवा इतर काही गोष्टी हव्या असतील तर ते मोठमोठयाने रडते व हातपाय हलवते. एवढेच ते करू शकते. पण जसजसे ते मोठे होत जाते म्हणजेच साधारणपणे सहा ते सात महिन्याचे होते तेव्हा ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या अवयवांच्या हालचालींवर थोडे थोडे नियंत्रण ठेवू लागते. आणि आपल्या विविध हालचालींमध्ये थोडा-थोडा समन्वय साधू लागते. आपण हातात खुळखुळा घेऊन तो वाजवू लागलो तर ते बाळ त्याकडे टकामका पाहू लागते. आवाजाच्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून बाळ हसते. दुसऱ्याच्या हातातील वस्तू आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करते. ती वस्तू आपल्या हातात धरायला शिकते. हातात धरलेली वस्तू तोंडांकडे न्यायला शिकते. पालथे, होण्याचा प्रयत्न करते, पोटावर दाब देत पुढे-पुढे सरकण्याचा प्रयत्न करते. समोर पडलेली वस्तू घेण्याचा प्रयत्न करते. कोणीही काहीही न शिकवता आपल्या हालचालींवर नियंत्रण मिळविता आले आणि हालचालींत समन्वय साधता आला की आणखीही वेगवेगळ्या प्रकारची काही कामे ते बाळ आपोआप करू लागते. उदा: वस्तू उचलून देणे, चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे, खुळखुळा वाजविणे, यांसारख्या गोष्टी ते लहान बाळ करू लागते. म्हणजेच मुलांनो, “स्वत:च्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे, याला ‘कौशल्य शिकणे’ असे म्हणतात. बाळ जसजसे मोठे होते. तसे ते नवीन-नवीन कौशल्ये शिकते. त्याचे त्याच्या आई वडिलांना व घरातील इतर सदस्यांना खूप कौतुक वाटते.