वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

विकास

views

4:34
एखाद्या मुलाला पाहून आपण म्हणतो, की त्याची वाढ किती छान झाली आहे! व्यक्तीची वाढ होणे म्हणजे त्या व्यक्तीचे उंची आणि वजन वाढणे होय. जसजसे आपले वय वाढत जाते, तसतशी आपली शारीरिक ताकदही वाढत जाते. तसेच आपण आपल्या वाढत्या वयाबरोबर अनेक कौशल्येही शिकत राहतो. त्यातूनच प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच व्यक्तीचा ‘विकास होणे’ असे म्हणतात. व्यक्तीत कौशल्ये जितकी जास्त असतात तेवढा व्यक्तीचा विकास जास्त होतो. तुम्ही जर नुकतेच जन्म झालेले गाईचे वासरू पाहिले आणि त्याचे बारकाईने निरीक्षण केलेत तर तुम्हाला दिसेल की, गाय त्या वासराला चाटून त्याचे अंग स्वच्छ करून घेते. त्यानंतर थोडया वेळाने ते वासरू स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्यात ते बऱ्याच वेळा पडते. पुन्हा ते उभा राहण्याचा प्रयत्न करते. व साधारणपणे ते एका तासाने नीट उभे राहते. नंतर थोडया वेळाने ते इकडे-तिकडे बागडू लागते व काही वेळाने ते गाईचे दूध पिऊ लागते. अशा प्रकारे गाईचे वासरू एका दिवसाच्या आत अनेक गोष्टी करायला शिकते. काही दिवसाने ते स्वत:चे अन्न स्वत: मिळवते व खाते. हे सर्व त्याला कुणी शिकवत नाही, तर ते आपल्या आईच्या अनुकरणातून शिकत असते. प्राणी स्वत:चे अन्न मिळवणे, ऊन, वारा, पाऊस यांपासून आपले संरक्षण करणे व शत्रूंपासून स्वत:चा बचाव करणे यांसारखी कौशल्ये आईकडून व आपल्या कळपातील इतरांकडून हळूहळू शिकत असतात. या सर्व गोष्टींत ते तरबेज झाल्यानंतर हे प्राणी आपल्या आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात. त्यांना कोणाच्याही आधाराची किंवा सोबतीची गरज लागत नाही. जीवन जगण्याची सर्व कौशल्ये त्यांनी शिकलेली असतात. त्यामुळे त्यांना जीवन जगताना एकटे असूनही काही अडचणी येत नाहीत. तसेच प्राण्यांसाठी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये अगदीच मर्यादित असतात. म्हणजे आपले अन्न मिळवता आले व आपले संरक्षण करता आले, की हे प्राणी स्वतंत्रपणे जगू शकतात. परंतु मानवाचे तसे नसते. मानवाला जगण्यासाठी अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, यांसारख्या मानवाच्या अनेक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला स्वतंत्रपणे खूप गोष्टी शिकाव्या लागतात. शिक्षण घ्यावे लागते. मगच तो स्वयंपूर्ण होऊ शकतो.