मानवी स्नायू व पचनसंस्था

पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये:

views

5:12
आता आपण पचनसंस्थेतील इंद्रियांची कार्ये व रचना पाहू. तोंड: अन्नाचा घास आपण सर्वप्रथम तोंडात घालतो. हा घास तोंडात घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न आपण आपल्या दातांनी चावतो. त्या घासाचे आपण बारीक बारीक तुकडे करतो. दातांचे मुख्य कार्य म्हणजे तोंडातील अन्नपदार्थांचा घास बारीक करणे हे असते. पटाशीचे दात, सुळे, दाढा, उपदाढा असे दातांचे प्रकार आहेत. प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हे कॅल्शिअमच्या क्षारापासून बनलेले असतात. आपले पटाशीचे दात हे तुकडा करण्यासाठी वापरले जातात. नंतर हे तुकडे बारीक करण्याचे काम उपदाढा व दाढा करतात. लाळग्रंथी: मुलांनो, घास चावून बारीक करत असताना पातळ होतो ते तुम्हाला माहीत आहे. असे होते कारण आपली अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. आणि म्हणून तो घास थोडा पातळसर झाल्याचे जाणवते. ही लाळ लाळग्रंथीमुळे तयार होते. ही लाळ कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते आणि आपण चावत असलेल्या अन्नात मिसळते. आपल्या लाळेत टायलीन नावाचा पाचकरस असतो. ग्रसनी/घसा: मुलांनो, चावून बारीक झालेला घास अन्ननलिकेतून खाली जातो. पण आपल्या अन्ननलिकेचे व श्वसननालिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. ग्रासिका: ही नळी घशापासून जठरापर्यंत असते. अन्न पुढे ढकलण्याचे काम ही नळी करत असते. जठर: अन्ननालिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जाठरातील जाठरग्रंथीमधून जाठररस स्त्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जाते. हे अन्न घुसळून घुसळून अगदी पातळ खिरीसारखे केले जाते. नंतर त्यात जाठररसाचे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सीन, म्युकस हे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यत: प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. यकृत: ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे हे आहे. यकृत हे आपल्या शरीरात उजव्या बाजूला पोटाच्या वर असते. यकृताचा रंग हिरवट तपकिरी असतो. तसेच यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृतातून स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहचतो आणि तेथील अन्नात मिसळून पचन सुलभ व्हायला मदत करतो. स्निग्धपदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात. स्वादुपिंड: मुलांनो, स्वादुपिंड ही एक पसरट लांब अशी ग्रंथी आहे. स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. त्यात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज ही विकरे असतात. लहान आतडे: जठरातून अन्न पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. लहान आतडे हे सुमारे सहा मीटर लांबीचे व सुमारे दीड इंच रुंद नळीच्या आकाराचे असते. यातला अन्नमार्ग मोठया आतड्याच्या तुलनेत लहान व अरुंद असतो म्हणून याला लहान आतडे म्हणतात. अन्न जठरातून आतड्यात आल्यानंतर त्यात तीन रस मिसळतात. या रसांमुळे अन्नातील घटक नीट पचवले जातात. हे घटक हळूहळू आतड्यांच्या आवरणातून रक्तात शोषले जातात. अन्नाचे बहुतेक पचन व शोषण लहान आतड्यात होते. आपण आजारी पडल्यावर घेतली जाणारी औषधे देखील लहान आतड्यात शोषली जातात. मोठे आतडे: मोठ्या आतड्यांची लांबी 1.5 मीटर असते. ते आपल्या पोटात विशिष्ट रचना करून बसवलेले असते. मोठ्या आतड्यात फक्त पाण्याचे शोषण होते. लहान आतड्यातून चोथा व पाणी असलेला टाकाऊ पदार्थ मोठया आतड्यात येतो. तेथे पाणी शोषले जाऊन सर्व चोथा आवळून गुदद्वारामार्फत बाहेर टाकला जातो. या आतड्याच्या सुरुवातीस उजव्या टोकाला एक मिरचीसारखा दिसणारा दोन तीन इंचाचा अवयव असतो. याचा शरीराला तसा काही उपयोग होत नाही. मात्र त्याला सूज आल्यावर खूप त्रास होतो. हा अवयव म्हणजेच अपेंडिक्स किंवा आंत्रपुच्छ होय. तर अशी विविध कार्ये पचनसंस्थेतील इंद्रियांची आहेत.