शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

प्रस्तावना

views

4:01
शिवाजी महाराजांपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता या विषयी जाणून घेणार आहोत. यात आपण धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक गोष्टींचा विचार करणार आहोत. यापूर्वी आपण पाहिले की बहमनी राज्याचे विभाजन म्हणजेच तुकडे होऊन त्यातून पाच शाही उदयास आल्या. त्यातील दोन मोठ्या शाही म्हणजे अहमदनगरची निजामशाही व विजापूरची आदिलशाही. यांच्याकडे १७ व्या शतकात महाराष्ट्राचा बराच भाग होता. तसेच मुघलांनीही खानदेशात प्रवेश केला होता, त्यांच्याही ताब्यात महाराष्ट्राचा प्रदेश होता. मुघल महाराष्ट्रात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत होते. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्दी लोकांच्या वस्त्या होत्या. तसेच युरोप खंडातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच या सत्तांमध्येही सागरी प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघर्ष होत होते. त्यांच्यात व्यापाराची मक्तेदारी मिळविण्यासाठी आणि आपला माल खपवण्यासाठी बाजारपेठा आपल्या ताब्यात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, गोवा आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या मदतीने भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली होती. त्यांना ‘वखार’ असे म्हणत. या वखारीच्या माध्यमातून त्यांनी भारतातील दक्षिण प्रदेशात छोटासा का होईना पण प्रवेश केला होता. या सर्व परकीय सत्तांमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून किंवा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी नेहमी स्पर्धा असे. त्या स्पर्धेतून लढाया, युद्धे होत होती. त्यातून ते स्वतःची ताकद आजमावत असत. या संघर्षामुळे महाराष्ट्रातील लोक स्थिर, शांततामय आणि सुरक्षिततेचे जीवन जगू शकत नव्हते. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.