आपत्ती व्यवस्थापन

दुष्काळाची कारणे

views

3:13
प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असते. तेव्हाच ती घडते. आपण फक्त म्हणतो दुष्काळ पडला. पण विचार केला आहे का कधी की, हा दुष्काळ कशामुळे किंवा कोणत्या कारणांमुळे पडतो? दुष्काळाची कारणे मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशी दोन्ही प्रकारची आहेत. प्रथम आपण मानवनिर्मित कारणे पाहू.पहिलं कारण म्हणजे आपली वाढती लोकसंख्या. जी झपाट्याने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आपल्या गरजाही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे आपल्या गरजांसाठी आपण वृक्षतोड, जंगलतोड करतो. त्यामुळे जमिनीची धूप होऊन पाऊसही कमी पडू लागतो. आणि अवेळीही पडू लागतो. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. शिवाय मानव अशा परिस्थितीतही पाण्याचा काटकसरीने वापर न करता अमर्याद वापर करतो आहे. त्यामुळे दुष्काळाची समस्या निर्माण होते. तसेच कमी क्षेत्रात जास्त अन्न पिकविण्यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर पिकांसाठी करू लागलो. त्यामुळे आपली शेतजमीन नापीक तर होतेच पण रासायनिक खते वापरलेली अन्नधान्य आपण खाऊन आपले आजारही वाढतात. पिकांवर पडणारी कीड, रोग, टोळधाड, उंदीर - घुशी इत्यादी प्राण्यांकडून पिकांचा नाश होतो. त्यामुळेही अन्नधान्याचे नुकसान होऊन दुष्काळ पडण्याची शक्यता असते. पाण्याचा गैरवापर केल्यामुळे पाण्याच्या दुष्काळाला सामान्य जनतेला सामोरे जावे लागते. तसेच देशांच्या आपआपसांतील वादांमुळे अंतर्गत अशांतता सर्वत्र पसरते. शेतीकडे दुर्लक्ष होते. युद्ध हे देखील दुष्काळाचे मानवी कारण आहे.दुष्काळासाठी निसर्गदेखील कारणीभूत आहे, बऱ्याचदा अतिवृष्टीमुळे काही भागात नद्यांना पूर येतो. पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. पूर आला की पुरात लोकांची शेतातील पिकं, घरं, पाळीव जनावरं वाहून जातात. त्यांच्या पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याचा दुष्काळ पडतो. तसंच तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल हीदेखील दुष्काळाची कारणे आहेत. वादळांमुळे तर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय. हे अवर्षण म्हणजे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे.