असहकार चळवळ

प्रस्तावना

views

3:57
प्रस्तावना: आपण राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली ते पाहिले. त्यात मवाळ व जहाल असे दोन मतप्रवाह निर्माण झाले. त्यात जहाल गटाचे नेतृत्व लो. टिळक यांच्याकडे होते. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. इ.स १९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य: इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची उच्च पदवी घेऊन महात्मा गांधी इ.स १८९१ मध्ये हिंदुस्थानात आले आणि वकिलीचा व्यवसाय करू लागले. इ.स १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहत नाताळ, येथे एक खटला लढविण्यासाठी ते गेले आणि त्यांच्या जीवनात खूप मोठा बदल घडून आला.दक्षिण आफ्रिकेतील वसाहतीत हिंदी लोकांना इंग्रज गुन्हेगारांसारखे वागवत असत. हिंदी लोकांचा जागोजागी अपमान केला जात असे. १९०६ मध्ये ब्रिटीश शासनाने एका आदेशानुसार कृष्णवर्णीयांना म्हणजेच काळ्या लोकांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. तसेच हिंदी लोकांवर अन्यायकारक कर लादण्यात आले होते.गांधीनी प्रथम या अन्यायी कायद्यांविरुद्ध तेथील हिंदी लोकांना जागरूक करायला सुरुवात केली. त्यांनी सरकारविरुद्ध अहिंसात्मक लढा पुकारला. अशा अन्यायी कायद्याचा विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी प्रथम सत्याग्रहाचा प्रयोग केला. गांधीजीनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. गांधीजींचे भारतात आगमन: दक्षिण आफ्रिकेतील लढ्याला मोठे यश प्राप्त झाल्यानंतर ९ जानेवारी १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.