असहकार चळवळ

खिलाफत चळवळ

views

4:31
खिलाफत चळवळ :- तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा या खलिफाने जर्मनीच्या बाजूने इंग्लंडविरुद्ध युद्धात उडी घेतली. त्यामुळे हिंदी मुसलमानांच्या मनात खलिफाची बाजू घ्यायची की इंग्रजांची बाजू घ्यायची हा प्रश्न निर्माण झाला. हिंदी फौजांत मोठ्या प्रमाणावर मुसलमान होते व ते तुर्की सुलतानाच्या विरुद्ध लढण्यास तयार होणे अवघड होते. हे ओळखून ब्रिटिश पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांनी, युद्धसमाप्तीनंतर तुर्की साम्राज्याचे विभाजन आम्ही करणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा युद्ध समाप्तीनंतर तह झाला त्यावेळी तुर्की साम्राज्याचे तुकडे युरोपियन राष्ट्रांनी केले. त्याचे निरनिराळे प्रदेश आपापसात वाटून घेतले. तुर्की साम्राज्याला हात लावणार नाही असे दिलेले वचन इंग्रजांनी मोडल्याने हिंदी मुसलमान संतप्त झाले. खलिफांची सत्ता पूर्ववत त्याला मिळावी म्हणून त्यांनी खिलाफत चळवळ सुरु केली. म्हणजेच खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला ‘खिलाफत चळवळ’असे म्हणतात. या मागणीस राष्ट्रसभेने महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली आपला पूर्ण पाठिंबा दिला. हिंदुस्थानातील मुसलमानांची खिलाफत चळवळ ही न्याय्य व योग्य असल्याचे गांधीजींचे मत झाले. या प्रश्नावर जर हिंदू- मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरु केली, तर सरकार निश्चितच वठणीवर येईल, असे गांधीजींना वाटू लागले. या काळात फार मोठ्या प्रमाणात हिंदू – मुस्लिम ऐक्य भारतात दिसून आले. तुर्कस्थानचा प्रश्न सोडवला गेला नाही तर सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला.