मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

प्रस्तावना

views

5:55
या पाठात आपण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा इतिहास बघणार आहोत. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मराठयांनी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या रक्षणासाठी मुघलांशी जोरदार असा लढा दिला. या सत्तावीस वर्षांच्या सतत चाललेल्या या लढयाला ‘मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम’ असे म्हणतात. येथे ‘मराठा, हा शब्द ‘मराठी भाषा बोलणारे’ वा ‘महाराष्ट्रीयन लोक’ अशा अर्थाने वापरला जातो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे पराभूत होतील आणि मराठयांचे साम्राज्य आपले होईल असे स्वप्न बघणारा औरंगजेब शेवटी मराठयांना पराभूत करण्याच्या उद्देशाने इ.स. १६८२ मध्ये आपली गादी सोडून दक्षिणेवर चालून आला. तरीसुद्धा मुघलांबरोबरच्या चाललेल्या या लढाईत शेवटपर्यंत मराठे विजयी राहिले. मराठयांनी मुघलांना दिलेला हा लढा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी असा कालखंड होता. छत्रपती संभाजी महाराज :- संभाजीराजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे मोठे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी म्हणजे राज्यकारभाराचे शिक्षण आणि लष्करी मोहिमांचे प्रशिक्षण दिले होते. वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच राजकारणाचे धडे घेत वयाच्या १४ व्या वर्षापासून संभाजी महाराज राज्यकारभार व सैन्याचे आधिपत्य कसे करायचे यात लक्ष घालू लागले. वयाच्या १७ व्या वर्षी रायगडावर त्यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले. संभाजीराजे यांची युद्धनीती ही जबरदस्त होती. त्यांच्या युद्धकौशल्याचे वर्णन करताना त्या वेळेचा फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे म्हणतो ‘हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस शोभेल असा शूरवीर आहे.’