अनुवंशिकता व परिवर्तन

मेंडेलची द्विसंकर संतती (Dihybrid Cross)

views

04:03
आता आपण मेंडेलच्या द्विसंकर संततीच्या प्रयोगाविषयीची माहिती घेऊ. मेंडेलच्या द्विसंकर पद्धतीमध्ये द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश होतो. मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोडया एकाचवेळी वापरून संकरणाचे आणखी प्रयोग केले. यामध्ये त्याने गोल-पिवळया (RRYY) बिजांच्या झाडांचा सुरकतलेल्या – हिरव्या (rryy) बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यामध्ये बीजाचा रंग व प्रकार अशा दोन लक्षणांचा समावेश आहे. म्हणून याला ‘द्विसंकर’ असे म्हणतात. जनक पिढी (P1): मेंडलने गोल पिवळी बीजे येणाऱ्या तसेच सुरकतलेली – हिरवी बीजे येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग केला व त्यामध्ये जो बदल घडून आला तो पुढील तक्त्यांमध्ये दिला आहे त्याचे निरीक्षण करा. मेंडेलने द्विसंकर संततीचे प्रयोग केले तेव्हा त्यांनी विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश केला. बीजाचा रंग व प्रकार अशा दोन लक्षणांचा समावेश असणाऱ्या गोल-पिवळ्या (RRYY) बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या – हिरव्या ( rryy ) बीजांच्या झाडांशी संकर घडवल्यामुळे गोल आकार आणि पिवळा रंग ही प्रभावी लक्षणे दिसून आली. तर सुरकुतलेला आकार आणि हिरवा रंग ही अप्रभावी लक्षणे दिसून आली. (P1) या जनक पिढीमध्ये युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्र रीत्या वेगळी होते. म्हणजेच (RRYY) झाडांपासून RY ही युग्मके तयार होतात. तसेच rryy झाडांपासून ry ही युग्मके तयार होतात. युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकांद्वारे होते. एकसंकर प्रयोगाच्या निष्कर्षावरून द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना पिवळे, गोल वाटाणे येतील अशी मेंडेलची अपेक्षा होती. त्याचे अनुमान बरोबरही होते. या वाटाण्याच्या झाडाची जनुकविधा YyRr असली तरी स्वरूपविधा मात्र पिवळ्या गोल बिया येणाऱ्या झाडांप्रमाणे होती. कारण पिवळा रंग हा हिरव्यापेक्षा प्रभावी व गोल आकार हा सुरकुतलेल्या आकारापेक्षा प्रभावी होता. द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना दोन लक्षणांच्या समावेशामुळे द्विसंकरज म्हणतात. हे द्विसंकरज F1 पिढीतील झाडे चार प्रकारची युग्मके तयार करतात. ती म्हणजे RY, Ry, rY, ry. यांपैकी RY व rY ही युग्मके P1 युग्मकांप्रमाणेच आहेत. त्यानंतर F1 पिढीतील झाडांचे स्वफलन घडून येते तेव्हा दुसरी संतानीय पिढी F2 तयार होते.