जैवतंत्रज्ञानाची ओळख

जैवतंत्रज्ञान

views

03:18
सजीवांच्या शरीरातील काही पेशी जिवंत असून त्या पूर्णक्षम असतात. त्यामुळे त्या पेशींपासून नवीन सजीव तयार होऊ शकतो. पेशीच्या या गुणधर्माचा व त्यामध्ये असणाऱ्या जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांचे बियाणे, जनावरांच्या नवीन प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी ह्या जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करता येतात. नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती व प्राणी यांची उत्पत्ती ही तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे. मानवी फायद्याच्या हेतूने सजीवांमध्ये कृत्रिमपणे जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊतीसंवर्धन या दोन्ही तंत्रांचा वापर केला जातो. त्याचा उपयोग नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ, लसनिर्मिती करणे, जन्मजात रोगाचे निदान करणे, इंद्रियाचे रोपण करणे, कर्करोगावर संशोधन करणे, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा तयार करणे इत्यादींसाठी केला जातो. अशाप्रकारे जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास करणे हे विज्ञान शाखेमध्ये खूप महत्त्वाचे आहे.