कार्य आणि ऊर्जा

स्थितिज ऊर्जा

views

3:25
आता आपण स्थितिज उर्जेविषयी माहिती करून घेऊया. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला, उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते, तसेच दाबलेली स्प्रिंग सोडली, या वाक्यांमध्ये ताणलेल्या, उंचावर, दाबलेली हे शब्द त्या वस्तूची स्थिती दर्शवतात. धनुष्यातून बाणाचे सुटणे, उंचावरचे पाणी खाली असलेल्या नळातून येणे, तसेच दाबलेली स्प्रिंग पूर्ववत होणे या सर्व क्रिया होताना वस्तू गतिमान होत आहेत. मग मला सांगा या वस्तू गतिमान होण्यासाठी त्यांना ऊर्जा कोठून मिळाली असेल त्या वस्तूंमध्ये त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ऊर्जा असते. आणि त्या वस्तू गतिमान होताना त्यातील ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. त्या स्थितीत या वस्तू नसत्या तर त्यांचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाले नसते आणि त्या गतिमान झाल्या नसत्या. यावरून आपल्याला असे समजते की, ‘पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात’. उदा: तुम्हाला चावीचे घड्याळ माहीत असेल. या घड्याळाच्या आत चावीमुळे स्प्रिंग गुंडाळलेली असते. म्हणजेच त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते. चावी दिली की स्प्रिंग गुंडाळली जाते. ती हळूहळू सुटू लागली की घड्याळाचे काटे गतिमान होतात. त्याचप्रमाणे चावी देऊन चालणारे खेळणे. स्थितिज ऊर्जेला इंग्रजीत Potential Energy असे म्हणतात. थोडक्यात स्थितिज ऊर्जा म्हणजे वस्तूत तिच्या विशिष्ट स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा असते. स्थितिज ऊर्जा = वस्तुमान × गुरुत्व बल × उंची ( P.E. = mgh ) या सूत्राने काढतात