पर्यावरणीय व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता

views

03:53
आज कचरा ही खूप मोठी समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. मोठया शहरांमध्ये तर या कचऱ्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. यामुळे वातावरण दूषित तर होतेच पण माणसेही आजारी पडतात. म्हणून या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे आहे. तर आता आपण घनकचरा व्यवस्थापनयाविषयी माहिती करून घेऊ या. कचऱ्यामुळे प्रदूषण होते हे तर तुम्हाला माहित आहे, तर मग सांगा प्रदूषण म्हणजे काय? मानवी कृती किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे जेव्हा पर्यावरण दूषित होते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन सारेच निरनिराळ्या पद्धतीने दूषित होते. हवेत विषारी वायू किंवा धुलीकण मिसळतात. पाण्यात आणि जमिनीतही अनेक विषारी रसायने मिसळली जातात. शिवाय अनेक प्रकारच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण होते. अशाप्रकारे आजूबाजूचा परिसर प्रदूषित होतो. मानवाच्या दैनंदिन कृतीतून अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांनाच घनकचरा असे म्हणतात. नको असलेले घन स्वरूपातले टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा होय. आपल्याला त्याची आवश्यकता नसते तेव्हा आपण ते टाकून देतो. उदा. घरगुती कचरा, औद्योगिक म्हणजेच कारखान्यांतून येणारा कचरा, जैववैद्यकीय कारणांनी निर्माण होणारा कचरा, अशा अनेक प्रकारे कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर तो एक ऊर्जेचा उत्तम स्रोत बनू शकतो. उदा. कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते. सध्या संपूर्ण जगभर घनकचरा ही एक मोठी समस्या बनली आहे. या कचऱ्यामुळे जमीन व पाणी हे दोन्ही प्रदूषित होतात. घनकचरा ही आर्थिक विकास व पर्यावरणाचा तसेच आरोग्याचा ऱ्हास याबाबतीत एक खूप मोठी गंभीर बाब बनली आहे. व त्यामुळे मानवी अधिवासाला खूप मोठया प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.