लोकसंख्या

स्थलांतर

views

4:31
स्थलांतर हा लोकसंख्येवर परिणाम करणारा घटक महत्त्वाचा घटक आहे. प्रथम आपण स्थलांतराची व्याख्या पाहू. ‘स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे’. स्थलांतराचे अनेक प्रकार आहेत. स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदा. विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इ. कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते. कारण त्या भागातून लोक दुसऱ्या प्रदेशात जातात. त्यामुळे अशा प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. याउलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात, तेथील लोकसंख्या वाढते. या वाढलेल्या लोकसंख्येचा पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक यांसारख्या सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. स्थलांतर अनेक प्रकारचे असते. ते कोणत्या प्रकारचे आहे यावारून त्याचा विकासाशी असणारा संबंध ठरतो. उदा. भारतातून अनेक उच्च शिक्षित तरुण मुले-मुली परदेशांत नोकरीसाठी जातात. त्यांच्यामुळे परदेशातील विकासाला हातभार लागतो. भारतामध्ये कार्यक्षम लोकसंख्या विपुल प्रमाणात असल्याने त्यांच्या स्थलांतराने भारताचा विकास खुंटत नाही. याउलट बीडसारख्या जिल्ह्यातून ऊसतोडणी कामगार हंगामी स्थलांतर करून महाराष्ट्राच्या इतर जल्ह्यात जातात. त्यांच्या अस्थिर निवासामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतात.